Ad will apear here
Next
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बी. पी. सिंग, विक्रम गोखले यांचा विशेष सन्मान
ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साउंड’ जाहीर
बी. पी. सिंग आणि विक्रम गोखले

पुणे :
अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शक असलेले बी. पी. सिंग आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल १८व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना या वर्षीचा ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साउंड’ हा पुरस्कार दिला जाणार आहे. ‘पिफ’चे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे उपसंचालक हंसध्वज सोनावणे, अमित त्यागी या वेळी उपस्थित होते.

‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पिफ) हे १८वे वर्ष असून, ‘महाराष्ट्राचे हीरकमहोत्सवी वर्ष’ ही या वर्षीची ‘थीम’ आहे. नऊ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असून, त्या वेळी बी. पी. सिंग, विक्रम गोखले आणि उषा खन्ना यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळी सीआयडी या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्याबरोबर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची खास उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमानंतर जुआन होजे कँपानेला दिग्दर्शित ‘द विझल्स टेल’ हा अर्जेंटिनाचा चित्रपट महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून लॉ कॉलेज रस्ता व कोथरूड येथील ‘एनएफएआय’मध्ये दाखविला जाईल, अशी माहितीही डॉ. पटेल यांनी या वेळी दिली.

पत्रकार परिषदेत मराठी स्पर्धात्मक चित्रपटांच्या नावांची घोषणादेखील करण्यात आली. या विभागात निवड झालेले मराठी चित्रपट असे -

‘तुझ्या आईला (शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते)’ - दिग्दर्शक सुजय सुनील डहाके
‘चिवटी’ - दिग्दर्शक राजकुमार लक्ष्मणराव तांगडे
‘वाय’- दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर
‘फोटो प्रेम’ - दिग्दर्शक आदित्य राठी व गायत्री पाटील
‘स्माइल प्लीज’ - दिग्दर्शक विक्रम फडणीस
‘बोन्साई’ - दिग्दर्शक समीर आशा पाटील
‘आनंदी गोपाळ’ - दिग्दर्शक समीर संजय विद्वांस

याबरोबरच या वर्षी पहिल्यांदाच ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशनदेखील आयोजकांकडून जाहीर करण्यात आली होती.

त्यातील लघुपटांची नावे अशी - १) ‘सोयरीक’ (दिग्दर्शक - बंडुराव वसंत जाधव), २) ‘थालकाठी’ (दिग्दर्शक – विवेक पी कुलकर्णी), ३) तारपा (दिग्दर्शक - विशाल एकनाथ बर्डे), ४) थाळी वाद्य (दिग्दर्शक - पवन प्रभाकर धावरे), ५) ‘चंकी सोकडा’ (दिग्दर्शक - धर्मा वानखडे), ६) ‘रानी बेटी’ (दिग्दर्शक - धर्मा वानखडे), ७) ‘मूळ’ (दिग्दर्शक - सुयोग देशपांडे), ८) ‘पडकाई ‘ (दिग्दर्शक - अमर मेलगिरी), ९) ‘थालसर- बंगसर’ (दिग्दर्शक - आर एम जाधव), १०) ‘द मायटी गॉंट्स- ब्रिक्स ऑफ चंदगड’ (दिग्दर्शक –विपलव सुभाष शिंदे), ११) ‘नंदी बैल’ (दिग्दर्शक - राहुल रामचंद्र पवार), १२) ‘भांगासार थाल’ (दिग्दर्शक- राहुल रामचंद्र पवार), १३) ‘आर्ट ऑफ लाईफ’ (दिग्दर्शक- सायली तनपुरे), १४) ‘तारपा- ऑर्गन्स ऑफ अॅन इनोसंट कल्चर’ (दिग्दर्शक – मनोज अप्पासो जाणवेकर), १५) ‘वनोपचार आदिवासींचा’ (दिग्दर्शक- प्रशांत काढे)

पुरस्कारविजेत्यांची ओळख :
या वर्षी ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ जाहीर झालेले बी. पी. सिंग अर्थात ब्रिजेंद्र पाल सिंग हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी निर्माते व दिग्दर्शक आहेत. देशात सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल २१ वर्षे सुरू राहणारी मालिका हा विक्रम नोंदविलेल्या ‘सीआयडी’ या मालिकेचे ते निर्माते व दिग्दर्शक आहेत. याच मालिकेत त्यांनी डीसीपी चित्रोले हे पात्रदेखील साकारले आहे. याशिवाय सोनी टीव्हीवरील ‘आहट’ ही भयपट मालिका आणि इतर मालिकांचे दिग्दर्शनदेखील त्यांनी केले आहे. पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष म्हणून ते सध्या जबाबदारी पार पाडत आहेत.

दुसरे पुरस्कार विजेते विक्रम गोखले हे मराठी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. चित्रपट, मालिका व नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले असून, अभिनयासोबतच लेखन, दिग्दर्शन क्षेत्रातदेखील त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ या चित्रपटाचे समीक्षकांकडून विशेष कौतुक झालेले आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केलेले आहे. घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या विक्रम गोखले यांनी ‘कथा’, ‘कमला’, ‘जावई माझा भला’, ‘दुसरा सामना’, ‘समोरच्या घरात’, ‘सरगम’, ‘स्वामी’ या नाटकांबरोबरच ‘आघात’,’आधारस्तंभ’, ‘दे दणा दण’, ‘नटसम्राट’, ‘माहेरची साडी’, ‘लपंडाव’, ‘सिद्धांत’ या मराठी चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. ‘स्वर्ग नरक’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘हसते हसते’, ‘हे राम’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्येदेखील त्यांनी भूमिका निभावल्या आहेत. ‘अकबर बिरबल’, स्टार प्रवाहवरील ‘अग्निहोत्र’, ‘अल्पविराम’, दूरदर्शनवरील ‘उडान’, ‘कुछ खोया कुछ पाया’, ‘जीवनसाथी’, ‘द्विधाता’, ‘मेरा नाम करेगा रोशन’, झी मराठीवरील ‘या सुखांनो या’, ‘विरुद्ध’, ‘संजीवनी’ व ‘सिंहासन’ या त्यांच्या मालिकाही खूप गाजल्या.

उषा खन्नाज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना हिंदी चित्रपटसृष्टीत सुरुवातीच्या काळातील महिला संगीतकार म्हणून ओळखल्या जातात. ‘एक सपेरा, एक लुटेरा’ चित्रपटातील ‘हम तुमसे जुदा हो के...’ ‘छोडो कल की बातें’, ‘शायद मेरी शादी का खयाल’, ‘जिंदगी प्यार का गीत है’, ‘आप तो ऐसे ना थे’ ही गाणी उषा खन्ना यांची ओळख आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेली ४० वर्षे यशस्वीपणे त्या संगीत दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत आहेत. १९८३ साली आलेल्या ‘सौतन’ चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZWUCI
Similar Posts
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १० ते १७ जानेवारीदरम्यान पुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात ‘पिफ’ यंदा १० ते १७ जानेवारी, २०१९ दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या ‘पिफ’ची प्रमुख संकल्पना असून, त्याअंतर्गत
वॉक फॉर खादी : ‘ला-क्लासे’ फॅशन शोने जिंकली मने पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित ‘ला क्लासे’ फॅशन शो नुकताच पार पडला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्राचा आणि खादीचा सन्मान वाढविण्याच्या उद्देशाने ‘वॉक फॉर खादी : द नेशन्स प्राइड’ या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी
पुणेकरांनी घेतला विविध कलांचा आस्वाद; पुणे आर्ट फेस्टिव्हलला चांगला प्रतिसाद पुणे : रंगसमर्थ आर्ट स्टुडिओ या संस्थेतर्फे पुण्यात नुकतेच पुणे आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. कलाप्रेमी गणेश केंजळे यांच्या कल्पनेतून फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील कला प्रदर्शन भरविण्यात आले होते. देशभरातून १००हून अधिक कलाकारांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता. ‘थ्रेड आर्ट’सारख्या
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language